साळवण (प्रतिनिधी) : नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या गगनबावडा तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. वीक एंडला तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु काही हुल्लडबाज पर्यटकांच्या गैरप्रकाराचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातच पोलिसांचा वचक न राहिल्याने पर्यटनस्थळावरील शांतता धोक्यात आली असून अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

चार दिवसापूर्वी शेणवडे गावाजवळ दोन हुल्लडबाज तरुणांनी एक फोर व्हिलर गाडी अडवली. आणि त्या गाडीतील लोकांना मारहाण केली. यावेळी ग्रामस्थांनी त्या तरूणांना अडवून घरी जाण्यास सागितले. परंतु हे तरूण उलट अश्लिल भाषेत   शिवीगाळ करू लागले. यावर पोलिसांना बोलविण्याची त्यांना भीती दाखविण्यात आली. परंतु त्यांची मग्रुरी काही कमी झाली नाही. उलट नागरिकांना अरेरावी करू लागले.

कोदे, अंदूर, वेसरफ व लखमापूर तलावावरती पार्टी करण्यासाठी पर्यटक शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात येत असतात. डीजे लावून दारू पिवून डान्स दंगा मस्ती करत असतात. या चारही तलावाच्या साईटला शेतकरी गवत राखतात. पण हे हुल्लडबाज पर्यटक दारू पिऊन बाटल्यांचा खच गवतात टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे.

याबाबत अंदूर ग्रामपंचायतीने वेळोवेळी खबरदारी घेऊन तळीरामांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. पण त्यांना समज देवून सोडण्यात आले. तरीही हुल्लडबाजांचे गैरप्रकार कमी झालेले नाहीत. यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई  करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.