धनंजय महाडिक यांनी ‘त्या’ लोकांची नावे जाहीर करावीत

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे आव्हान   

0
333

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा का भरलेला नाही ?, पंढरपूरच्या भीमा साखर कारखान्यातील शेतकरी, कर्मचाऱ्यांची  कोट्यवधीची देणी का थकीत आहेत ? ५ हजार लोकांना रोजगार देण्याइतका भीमा उद्योग समूह मोठा आहे का? असा सवाल करून  माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ५ हजार लोकांची नावे जाहीर करावीत,  असे प्रतिआव्हान माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी दिले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले  आहे  की, घोडेबाजार करून स्थायी सभापतीपद मिळवलेल्या आशिष ढवळे यांनी  महापालिकेच्या हिताबाबत  आम्हाला शिकवू नये. त्यांनी केलेल्या कामाबाबत आत्मपरीक्षण करावे. खासदार असताना धनंजय महाडिक यांनी महापालिकेला किती निधी दिला?,  १८ वर्षे विधान परिषदेचे आमदार असताना महादेवराव महाडिक यांनी शहराच्या विकासासाठी किती निधी आणला?  महाडिक यांनी एकतरी सार्वजनिक हिताचा प्रकल्प सुरू केला आहे का ? याची माहिती कोल्हापूरच्या जनतेला द्यावी.

माजी खासदार यांनी  रोजगार देण्याऐवजी काढून घ्यायचेच काम केले आहे. भीमा एज्युकेशन सोसायटीचे विकासवाडी येथील इंजिनिरिंग कॉलेज बंद पाडले.  त्यामुळे तेथील लोकांचा रोजगार गेला आहे. त्याचबरोबर  त्यांना अनेक महिने पगारसुद्धा मिळालेला नाही. असे असताना  ५ हजार जणांना रोजगार दिला,  हे म्हणणे कितपत खरे आहे ?