हिरवडे खालसा येथील धनाजी पाटील यांचे आमरण उपोषण मागे 

0
83

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा येथे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी मागील सात दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते. त्यांनी आज (मंगळवार) आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात धनाजी पाटील यांनी गेले सात दिवस आमरण उपोषण केले. शौचालय अनुदान घोटाळा हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. याशिवाय पेयजल योजनेत पंचवीस लाख रुपयांचा अपहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे दलित समाजाला व्यायामशाळेची मंजुरी, बनावट कागदपत्रांच्या आधारे घरकुल योजना हे त्यांचे आरोप होते. आमरण उपोषण करूनही शासनाकडून  दखल घेतली जात नसल्याने आज मंगळवारी  ते आत्मदहन करणार होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिकेचे अग्निशमन दल व आरोग्य विभागही सतर्क होता.

त्रयस्थ यंत्रणेमार्फत शौचालयाचे रचनात्मक मूल्यमापन करून दोष आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे व करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी दिले. यानंतर धनाजी पाटील यांनी उपोषण मागे घेतले.