हिरवडे ग्रा. पं. च्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आत्मदहन : धनाजी पाटील (व्हिडिओ)

0
145

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध योजनांत लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे वारंवार प्रकरणी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप करीत गावातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यामधील दोषींवर चौकशीअंती कारवाई न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

धनाजी पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, हिरवडे खालसा येथील सरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी ४२ जणांना शौचालयाचे अनुदान मिळवून दिले आहे. वीस लाभार्थ्यांनी जुनी शौचालये दाखवली आहेत, तर तिघांची शौचालये अस्तित्वातच नाहीत. पेयजल योजनेत पंचवीस लाख रुपयांचा अपहार झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दलित समाजाकरिता व्यायामशाळा मंजूर करून निधी उपलब्ध झाला होता. तक्रारीनंतर तो निधी शासनाला परत पाठविला. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे घरकुल योजनेतील निधी हडप केला असून काही सदस्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सदस्यत्व मिळवले आहे. या सर्व प्रकरणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रार करून देखील भ्रष्ट कारभाराची चौकशी केली जात नाही. ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी यांच्यावर या प्रकरणी तत्काळ गुन्हे नोंद करावेत अन्यथा, इचलकरंजी येथील आत्मदहनाची पुनरावृत्ती हिरवडे खालसा येथे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.