धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील तुळशी – धामणी परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या धामोड गावातील प्रत्येक शनिवारी भरणारा आठवडी बाजार २१ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच अशोक सुतार यांनी ‘लाईव्ह मराठी’ला दिली.

सरपंच अशोक सुतार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे नियमितपणे हा बाजार भरलेला नाही. या बंदच्या कालावधीत गावातील सर्व व्यापाऱ्यांनी केलेले सहकार्य आणि त्याला धामोडसह आसपासच्या वाडीवस्तीतील जनतेने दिलेली साथ यासाठी कोरोना दक्षता कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. सर्वांच्या सहकार्याने राधानगरी तालुक्यातील इतर परिसराच्या तुलनेत येथे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे.

गेली चार दिवस व्हॉट्सअपवर येत्या १४ तारखेपासून बाजार सुरू होणार, असा मॅसेज फिरत आहे. परंतु राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी तालुक्यातील इतर ठिकाणची रुग्णसंख्या पाहता २१ तारखेनंतर बाजार सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तरी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आणखी काही दिवस व्यापारी संघटनेने सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी एल. एस. इंगळे यांनी केले. यावेळी उपसरपंच प्रशांत पोतदार, पोलीस पाटील महादेव फडके, कोरोना दक्षता कमिटी आणि सदस्य उपस्थित होते.