कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी २०० रुपयांना पेड ईपास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आला होता. याप्रकरणी पूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी आज (सोमवार) पार पडली. यामध्ये तिसरे दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघल यांनी पेडपास आणि व्हीआयपी दर्शन रांगेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. तसेच व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन तातडीने घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यंदा पेड ईपास देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये भाविकांना दोनशे रुपये देऊन हा पास दिला जाणार होता. यासाठी स्वतंत्र दरवाज्यातून त्यांना आत प्रवेश दिला जाणार होता. पण याला कोल्हापुरातील काही संघटनांनी जोरदार विरोध केला होता. ज्यांना तातडीने दर्शन पाहिजे त्यांना दर्शन मिळेल आणि देवस्थान समितीला चांगला निधी मिळेल, असे देवस्थान समितीने घाट घातला होता. त्याला विरोध झाल्यानंतरही तो करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

अखेर, पुजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयाला के. आर. सिंघेल यांनी परवानगी नाकारली आहे. पेडपास बरोबरच व्हीआयपीसाठी स्वतंत्र दर्शनाच्या रांगही केली जाऊ नये, असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.