पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जेजुरीचे पो. नि. सुनील महाडिक यांनी दिली. ते आज (गुरुवार) जेजुरी येथील खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवती यात्रा रद्द करण्यात आली असून पालखी सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन दिवस जेजुरीत येणे टाळावे. येथील व्यावसायिकांनी भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये. तीन दिवस खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मंगळवारनंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी विश्वस्त मंडळ करेल, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सहकार्य करावे, भाविकांनी तीन दिवस जेजुरीत येणे टाळावे, असे आवाहन केले. या वेळी मुख्य वतनदार राजाभाऊ पेशवे, सचिन पेशवे, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे आदी उपस्थित होते.