मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) प्रतिआव्हान दिले आहे. ते अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरून राज्य सरकार घाबरत आहे. या विरोधकांच्या वक्तव्यावर उत्तर देताना विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणून दाखवावा, आम्ही तो वाजवून दाखवू, असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते.

यावर फडणवीस म्हणाले की, विधिमंडळाच्या कामकाजाबाबत घटनेनं जी जबाबदारी दिली आहे ती झटकायचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यपालांनी नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असा सल्ला दिला होता. मात्र राज्य सरकारने तो ऐकलेला नाही. कालच्या विधानावरून अजित पवार यांच्या मनातील भीती दिसून आली. अजित पवार यांना अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचेच आमदार, मंत्री विरोधात मदत करतील, अशी भीती वाटत आहे. तसेच त्यांनी काल केलेल्या विधानाला काहीही अर्थ नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.