नागपूर (वृत्तासंस्था) : राज्यात सत्तानाट्य घडण्यापूर्वी पडद्यामागून किंगमेकारची भूमिका साकारणारे देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या वेळी वेशांतर करुन घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते. मी त्यांना ‘तुमचे काय सुरू आहे’ असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे, असे गुपित अमृता फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना उघड केले.

अमृता फडणवीस म्हणाल्या, राज्याची स्थिती कोलमडणे, इगो राईट्स, लोकांची घरे तोडणे, हनुमान चालिसा, लोकांच्या समस्या, एसटी कर्मचारी संप असो की ओबीसी आरक्षण आदी विविध कारणे असो त्यामुळे मलाही भाजपची सत्ता परत येणार हे वाटतच होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ते येतील असे सर्वांनाच वाटत होते; पण ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावर अमृता म्हणाल्या की, मला थोडे आधीपासून समजले होते की, देवेंद्र मुख्यमंत्री होणार नाहीत. त्याशिवाय ते कोणतेही पद स्वीकारणार नाही, हेही मला माहीत होते. एकनाथ शिंदे हेसुद्धा देवेंद्र यांच्यासारखेच सेवक आहेत. त्यामुळे दोघे पदावर असो की नसो ते एकत्रित खूप चांगले काम करणार आहेत, याची शाश्वती होती. त्यामुळे देवेंद्र कोणते पद घेत आहेत अथवा नाही याचा काहीही फरक पडणार नव्हता.

अमृता म्हणाल्या, मला थोडे वाटायचे की, काही न् काही सुरू आहे, पण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभागृहात याबाबतचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर देवेंद्र हे काय करीत होते हे सर्वांनाच कळाले. शिवसेनेत किती अस्वस्थता आहे, हे आमदारांनी सांगितल्यानंतर स्पष्ट झाले. त्या अस्वस्थतेला भाजपने मार्ग देण्याचे आणि त्यांच्यामागे उभे राहण्याचे काम भाजपने केले हे चांगलेच आहे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.