देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी दिल्लीत दाखल

0
56

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेले होते. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. सूरतमधील हॉटेलमध्ये ३५ आमदार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या  दौऱ्यात  देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेण्याची दाट शक्यता आहे.