अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्यात ईडी चौकशीवरून अनेकदा राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. आता ईडी चौकशीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका असणाऱ्या आणि भाजपला अडचणीच्या ठरू शकणाऱ्यांविरुद्ध ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत. हे प्रकार सातत्याने सुरू असून यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) येथे केला आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करीत आहेत. देशात सर्वत्र भाजपच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही राजकारण खेळले जात आहे. येथेही भाजपच्या विरोधातील लोकांच्यामागे ‘ईडी’ची चौकशी लावली जात आहे. आमची आता खात्री झाली आहे की, हे सर्व फडणवीस हेच करीत आहेत. राज्यातील या वाढत्या प्रकारांकडे राज्य सरकार गंभीर्याने पाहत आहे. याबाबत लवकरच कायदा केला जाणार आहे. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करणाऱ्यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात महाविकास आघाडी सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.