कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्याप्रमाणे मानवी ज्ञानेन्द्रिय समोरच्या गोष्टींचे विश्लेषण करीत असतात त्याचप्रमाणे ही तंत्रे कोणतीही वस्तू खराब न करता त्यामधील असलेल्या कमतरतेचा शोध लावतात. आज कालच्या युगात अशा प्रकारच्या तंत्रांचे फार महत्त्व आहे अनेक औद्योगिक क्षेत्रे देखील अशा तंत्रांचा वापर करताना दिसतात, असे प्रतिपादन फरीदाबाद येथील मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीजचे प्रा. एस. के. चक्रवर्ती यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या आठवडी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत तिसऱ्या दिवशी सहभागी सदस्यांना अनेक वेगवेगळ्या विश्लेषण तंत्राची माहिती देताना चक्रवर्ती बोलत होते. यावेळी प्रा. सोनकवडे यांनी चक्रवर्ती यांचा सत्कार केला. पहिल्या सत्रात प्रा. एस के चक्रवर्ती यांनी कोणत्याही प्रकारचे नमुने खराब न करता त्याचे विश्लेषण करण्याच्या तंत्रांची माहिती दिली.

क्ष किरणे, अल्ट्रासाऊंड, चुंबकीय क्षेत्र, विद्युत प्रवाह, अशा प्रकारची तंत्रे यंत्रे खराब न करता त्यातील दोष शोधण्यासाठी उपयोगी पडतात. ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात बॉयलर अथवा मोठ्या टाकीला पडलेल्या भेगा शोधण्यासाठी क्ष किरणांचा वापर केला जातो. नुकत्याच झालेल्या गुजरातमधील पूल कोसळण्याच्या घटनेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला; परंतु अशा प्रकारच्या वस्तूंची पाहणी करण्याकरता, त्यातील दोष शोधण्याकरता नवीन विकसित तंत्रे वापरता येतात. ज्यामध्ये वस्तूंना कोणताही धोका पोहोचत नाही, अशा अनेक तंत्रांविषयी प्रा. चक्रवर्ती यांनी माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी ‘एक्स-रे डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोप’या उपकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. सैफ डीएसटी केंद्र कोल्हापूर येथील या अत्याधुनिक उपकरणांची सुविधा वापरण्यासाठी आय एस टी एम या पोर्टल द्वारे कशाप्रकारे नोंदणी करावी याविषयी देखील प्रा. सोनकडे यांनी माहिती दिली. सर्व सहभागी शिक्षक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांना सैफ डीएसटी सीएफसी येथील उपकरणांचे गटानुसार प्रात्यक्षिक दिले गेले.

प्रा. सोनकवडे हे आपल्या वैज्ञानिक आणि प्रशासकीय अनुभवाचा वापर करून स्तुति अंतर्गत खूप चांगले कार्यक्रम आयोजित करत आहेत. प्रा. सोनकवडे यांनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे, शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि सर्व व्यवस्थापन परिषदेच्या सभासदांचे आभार मानले.