रांगोळीत आक्रोश मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार    

0
285

रांगोळी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा आलेल्या महापुरात अनेक लोकांच्या शेती आणि प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. परंतु अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पंचनाम्याच्या नावाखाली कागदी घोडे नाचविण्याचे काम  शासन करत आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठकीचा धडाका सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रांगोळीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई यांनी ज्या गावात महापूर आलेला आहे. ते संपूर्ण गाव पूरग्रस्त जाहीर करणे, सरसकट कर्जमाफी करणे, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे  पुनर्वसन करणे, या मुद्द्यावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर सर्वांनी सहभागी होत हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी पक्ष तालुका युवा अध्यक्ष सुशील पाटील, रांगोळी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सातगोंडा हुन्नूरगे, जिल्हा कार्यकारणी सदस्य एम. आर. पाटील विद्याधर पाटील आदीसह स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.