…अखेर नियतीने डाव साधला : गोलिवडेतील ‘त्या’ शेतकऱ्याची प्राणज्योत मावळली 

0
99

कोल्हापूर  (प्रतिनिधी)  :  गोलीवडे (ता. पन्हाळा) येथील गरीब कुटुंबातील शेतकरी प्रभुनाथ गुरव (वय ३९) यांच्या मानेवर वैरणीचा भारा पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर  गेल्या ११ दिवसापासून कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी त्यांनी दिलेली झुंज व्यर्थ ठरली.  शनिवारी  (दि.२१) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मुत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रभुनाथ गुरव यांच्या मज्जातंतूच्या सर्जरीसाठी जवळपास ६ लाखांहून अधिक खर्च आला.  घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सदगुरू श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांनी गावातून सुमारे ९० हजारांची मदत संकलित केली.  याबाबत ‘लाईव्ह मराठी’ने ही  बातमी छापून मदतीचे आवाहन केले होते. समाजातील दानशूर संस्था,  व्यक्तींनी गुरव यांना मदत करण्यास सुरुवात केली.

मात्र, नियतीच्या मनात काय वेगळचं होतं. अखेर रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यूशी त्यांनी दिलेली झुंज व्यर्थ ठरली. आणि  शनिवारी सायंकाळी गुरव यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे गोलिवडे गावासह पन्हाळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडिल, भाऊ, पत्नी व ७ वर्षाचा मुलगा तर ३ वर्षाची मुलगी आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि.२३)  सकाळी ९ वाजता आहे.