नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चलन रुपयात कमालीची घसरण होत असून, आज तो डॉलरच्या तुलनेत ८१ रुपये प्रति डॉलर देखील पार केला आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.२० रुपयांपर्यंत घसरला होता आणि कालच्या तुलनेत त्यात ४१ पैशांची मोठी घसरण पाहायला मिळाली.

रुपया ८१.२० रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर आला असून, त्यामुळे चलन बाजार तज्ञ ते आयातदार आणि व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. कमजोर रुपयामुळे आयात महाग होते आणि देशांतर्गत उत्पादन आणि जीडीपीला धक्का बसतो. रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर तसेच सर्वसामान्यांच्या बजेटही मोठा परिणाम होतो.

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. डॉलरच्या किमतीमुळे कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी अधिक खर्च येईल. कारण कच्च्या तेलाचे पेमेंट डॉलरमध्ये जाते. यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास भाजीपाल्यापासून ते दैनंदिन वस्तूंच्या वाहतुकीच्या खर्चावर परिणाम होऊन सर्व प्रकारच्या वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत घसरल्याने आयात करण्यात येत असलेले भाग महाग होतील. ज्याचा ग्राहक टिकाऊ वस्तू उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. टीव्ही, फ्रीज, एसीपासून ते अनेक नियमित मागणी असलेल्या वस्तूंमध्ये आयात केलेले भाग वापरले जातात. रुपयाची घसरण झाल्याने आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आता महाग होणार आहेत.