नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमध्ये इएमआय भरणा-या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कर्ज स्थगित (मोरेटोरियम) कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यात व्याजावरील व्याज आकारले होते. आता ती रक्कम परत करण्यास बँकांनी सुरुवात केली आहे. या योजनेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ग्राहकांना एक निरोप पाठविला गेला आहे. प्रिय ग्राहक कोविड-१९ मदत अनुदान रक्कम 3 नोव्हेंबरला तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसह सर्व कर्ज देणा-या संस्थांना ६ महिन्यांच्या मुदतीच्या कालावधीत २ कोटी रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजावरचे व्याज परत करण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँक ऑफि इंडियाने सर्व सहकारी आणि खासगी बँकांना आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना ५ नोव्हेंबरपासून व्याजावर व्याज माफी योजना लागू करण्याचा आदेश दिला आहे. खरंतर लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्याकडून इएमआयवर घेतलेले व्याजावरचे व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात परत देणार असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयानंही ही सुविधा तात्काळ लागू करण्याच्या सल्ला दिला आहे. त्यानंतर आता आरबीआयनेदेखील या निर्णयाला हिरवा कंदील दाखवत ५ नोव्हेंबरपासून नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. कोरोना संकटामध्ये नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यंदा १ मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कर्जाचा हप्त्याला स्थगिती देण्याचा बँकांना सल्ला दिला होता. त्यानुसार काही बँकांनी सहा महिने हप्ते भरण्याला स्थगिती दिली होती. परंतु नंतर भरलेल्या इएमआयवर चक्रवाढ व्याजाने पैसे वसूल केले होते. ते आता परत मिळणार आहे.