कोल्हापुरात क्षयरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

0
110

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील क्षयरोग विभागातील करार तत्वावरील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विविध मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणारे करार तत्त्वावरील कर्मचारी मागील २२ वर्षांपासून सेवारत असून अद्यापही शासनाच्या उदासीनतेमुळे राज्यातील २२०० कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम होऊ शकले नाहीत. वारंवार मागणी करूनही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे तुटपुंजे मानधन व इंधन, यामधील तफावती दूर करावी, या बाबीचा निषेध नोंदविण्यासाठी व शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले जावे म्हणून निदर्शने करण्यात आली.

क्षयरोग विभागातील करार तत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविडसारख्या साथीमध्ये जिवाची पर्वा न करता काम केले आहे. तरीही त्यांच्याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. दि. ३ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन निदर्शने करण्यात आल्याचे राज्य क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

यावेळी संजय पाटील  समन्वयक विशाल मिरजकर, जिल्हा कार्याध्यक्ष यशोधन कुन्नुरे, उपाध्यक्ष धनंजय परीट, काजल देसाई,  स्मिता पाटील, शहर विभागाचे डॉ. रूपाली दळवी, अभिनव पोळ, कीर्ती घाटगे, सुशांत कांबळे, यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनास आरोग्य विभागातील विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.