सर्व दुकाने चालू करण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत निदर्शने…

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी आज (गुरुवार) गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने गांधीनगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

लॉकडाउन हटवा, व्यापाऱ्यांना वाचवा, असे विविध फलक घेऊन व्यापारी दुकानाच्या दारात घोषणा देत उभे होते. यावेळी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या एक तासाच्या कालावधीत ही निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक व्यवसायास सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीमध्ये व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिलेली आहे. पण कापड आणि इतर व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक व्यवसायाबरोबर इतर व्यावसायिकांना व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी घोषणा देत व्यापाऱ्यांनी केली.

गेल्या अनेक दिवसापासून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे व्याज, आणि इतर खर्च चालूच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी केली. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून करू पण व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनवणी काही व्यापाऱ्यांनी केली.

या आंदोलनात होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहुजा, उपाध्यक्ष अशोक तेहल्यानी, रिकी सचदेव, गोपालदास निरंकारी, विनोद आहुजा, मनोज बचवाणी, श्रीचंद पंजवानी,  कुमार गुरबानी, विनोद हुजूरानी, विक्रम मोहिते आदी व्यापारी सहभागी झाले.