कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असणारी ‘जगदंबा’ तलवार भारतात परत आणलीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेच्या वतीने आज (शनिवार) तावडे हॉटेल परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आंदोलक – पोलिसांची झटापट झाली. या वेळी २२ मार्चपर्यंत जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी सरकारनं कार्यवाही करावी अन्यथा २३ मार्चला पुण्यात होणाऱ्या इंग्लंड भारत सामन्याला तीव्र विरोध करण्यात येणार असून भगतसिंगाच्या शहीद दिनादिवशी शिवरायांचे मावळे काय असतात आणि भगतसिंग असे लढले होते हे इंग्लंडला दाखवून देऊ असा इशारा संघटनेच्या वतीने हर्षल सुर्वे यांनी दिला.

आंदोलनात प्रदीप हांडे, सागर पाटील, शुभम जाधव, विशाल खोचिकर, शरद चौगुले, अमृता सावेकर, केतन पाटील, अक्षय चाबूक, गणेश खोचिकर, प्रमोद नाईक, पवन तोरस्कार सहभागी झाले होते.