कोल्हापूर (प्रतिनिधी) : चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसीत करण्याबाबतचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शासकीय कार्यालये, रुग्णालयातील खाजगीकरण रद्द करण्यात यावे आणि सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ कोल्हापूरच्या वतीने आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आलीत.

दरम्यान, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ उद्या (शुक्रवार) लाक्षणिक संपावर जाण्याचा इशाराही यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सरकारी सेवेत सामावून घेण्यात यावे, वेतनत्रुटी संदर्भातील खंड २ च्या अहवालाची तात्काळ अमंलबजावणी करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट करण्यात यावी. अशा विविध २२ मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, संजय क्षीरसागर, महेश पाटील, शिवाजी निकम, अलेक्स डिसुझा, सचिन कोळी, गौतम घोलप यांच्यासह राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.