इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर व परिसरातील वहिफणी व नॉटिंग कामगारांना यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्या परिवारांना कायदेशीर संरक्षण मिळवून द्या, अशी मागणी जिल्हा व इचलकरंजी शहर वहिफणी एजंट असोसिएशनने केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी हे औद्योगिक शहर आहे. या शहरात यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार यासोबतच वहिफणी व नॉटिंग कामगारांची संख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात देखील वहिफणी व नॉटिंग कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना रोज काम केलं तरच पगार मिळतो. मात्र, हा कामगारवर्ग शासकीय योजनांपासून वंचित राहिला असून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. त्यामुळे या कामगारांना यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळामध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्या परिवारांना कायदेशीर संरक्षण मिळवून द्यावे.

या वेळी जिल्हाध्यक्ष महादेवराव गौड, शहराध्यक्ष बंडोपंत मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष मदन जाधव, शहर उपाध्यक्ष नौशाद सावळगी, अली खान उपस्थित होते.