कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीरवाडीचे ग्रामसेवक नीलेश विलास कुंभार यांनी अनेक लोकांना पैसे गुंतवायला लावून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्यावतीने चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी वाशी (ता. करवीर) येथील ग्रामसेवक नीलेश विलास कुंभार यांनी वाशी व पंचक्रोशीतील नागरिकांची लाख रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. पैसे दाम दुप्पट करतो म्हणून लोकांकडून एक लाखापासून दहा लाखांपर्यंत पैसे घेऊन ग्रोब्ज कंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडले. ग्रोब्ज कंपनीचे व ग्रामसेवकाचे संबंध असून, त्याने परस्पर पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. तीन ते चार महिने पैसे परतावा दिला. त्यानंतर मात्र पैसे देण्याची बंद केले.

अनेक वेळा विचारणा करून देखील कुंभाराकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कुंभाराचा भाऊ पोलीस असल्याने त्याने दबावाचे तंत्र अवलंबून आहे. भीतीपोटी अनेक जण तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. त्यामुळे सर्वच गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे. पैसे गुंतवणूक करायला भाग पाडून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन युनियनच्या वतीने दिले.

ग्रामसेवक या शासकीय नोकरीत असूनसुद्धा सध्या अजूनही गुंतवणूक करत असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे भविष्यात कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी चौकशी होईपर्यंत त्याला कामावरून निलंबित करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, सदस्य संभाजी कागलकर, संघटक लक्ष्मण सावरे, शहराध्यक्ष भारत कोकाटे, शहर संपर्कप्रमुख गणेश कुचेकर,  शहर सचिव प्रीतम कांबळे आदी उपस्थित होते.