राशिवडे प्रतिनिधी (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) येथे तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथून बाहेर कामानिमित्त प्रवास करणारा कर्मचारीवर्ग, शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. कोरोना कालावधीमध्ये बंद असणारी एसटी सेवा नुकतीच सुरू झाले आहे. परंतु, अपेक्षा इतक्या बसेसच्या फेऱ्या येथे सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने बस फेऱ्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.

सध्या राशिवडेपासून परितेपर्यंत ३ किलोमीटरची पायपीट करून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक एसटी विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, राशिवडेचे सरपंच कृष्णात पोवार, ग्रामस्थ आणि माजी सरपंच सागर धुंदरे यांनी राधानगरी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन एसटी सेवा सुरळीत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आगारप्रमुख सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना कालावधीमध्ये इथल्या गाड्या दुसऱ्या डेपोकडे वळविण्यात आल्या होत्या. तसेच या आगारातील काही बसेस स्क्रॅप करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस फेऱ्यांची नियमितता विस्कळीत झाली होती. पण लवकरच नवीन बसेस आपल्या ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे राशिवडे ते रंकाळा यासह सर्व बस फेऱ्या नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.