गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वासनोली गावचा जोगेवाडी धनगरवाडा स्वातंत्र्य मिळून सत्तरहून अधिक वर्षे होऊन गेली तरी विकासापासून वंचित आहे. विशेषत: वनजमिनीच्या जाचक नियमांमुळे इथे विकासाची कामे ठप्प आहे. इंचभरही वन जमीन वनेत्तर कामासाठी दिली जात नाही. जोगेवाडी धनगरवाड्यासह भुदरगड तालुक्यातील रस्ता नसलेल्या इतर धनगरवाड्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली.

भुदरगड तालुक्यातील मौजे वासनोली पैकी जोगेवाडीवरील धनगरवाड्यातील गरोदर महिलेला प्रसववेदना होऊ लागल्या. रस्ताच नसल्याने तिला बांबूच्या डालाचा पाळण्यात बसवून खांद्यावरून २ कि.मी. अंतरावरील वासनोली गावात आणले आणि तिथून रुग्णवाहिकेने तिला कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या घटनेवरून या भागातील रस्तेच नसल्याचे उजेडात आले. जोगेवाडी धनगरवाड्याला जाणारा बराचसा रस्ता हा खाजगी मालकीतून जातो. केवळ ३०० मीटर रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतून जात आहे. बसुदेव धनगरवाडा तसेच गिरगांव धनगरवाडयांचे जसे घरकूल योजनेतून जंगलातून गावाशेजारी पुनर्वसन झाले तसे इतरही धनगरवाड्यांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे, असे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.

या भागात वनखाते रस्ते करण्यास प्रतिबंध करते. आजही अनेक वाड्या वस्तीतील लोक रस्ते व सोयी सुविधा यांसाठी झगडत आहेत. कोणतीही वनजमीन वनेत्तर कामासाठी देण्यात येऊ नये असा कायदा आहे. असे जरी असले तरी एखादी जमीन जनतेच्या सोयीसाठी मिळवून द्यायची असेल तर लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.