पेठवडगाव (प्रतिनिधी) : उसाचा हंगाम सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघरे अद्याप थंडच असल्याचे दिसून येत आहे. गुळाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे तसेच उत्पादन खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा धंदा परवडत नसल्याचे गुऱ्हाळघर चालवणाऱ्या शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शासनाने साखरेला हमीभाव दिला आहे तसेच गुळाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

अवकाळी पडणारा पाऊस तसेच रोगांच्या आक्रमणामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे उसाचे वजनही घटत झाले आहे. एका गुऱ्हाळासाठी सात ते आठ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मजुराला रोज किमान तीनशे रुपये एवढी मजुरी व दोन किलो गूळ द्यावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गुळाच्या एका आधनाचा खर्च सरासरी अडीच हजार रुपये एवढा होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असली तरी गुळाला बाजारभाव मात्र ३५०० रुपयाच्या आसपास मिळत असल्यामुळे एकूणच हा धंदा परवडत नाही. गुळाला किमान साडेपाच हजार रुपये एवढा दर मिळाला तरच गुऱ्हाळघरे चालू शकतील; परंतु सध्या मात्र गुळाला कमी भाव मिळत आहे.

मार्केट यार्ड वारंवार गूळ सोंदे बंद पडत असल्यामुळे गुळाचा दर्जा कमी होतो व गुळाची नासाडी होते. खंडित विजेमुळे ही गुराकडे बंद ठेवावी लागत आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे डिझेल इंजिनवर गुऱ्हाळघरे चालवणे अशक्य बनले आहे. कुशल कामगारांचीही चणचण भासत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नवीन पिढी या धंद्यात येत नसल्यामुळे आता परप्रांतीय मजुरांवर गुऱ्हाळ मालकांना अवलंबून राहवे लागते.