गारगोटी येथे तलाठी, कोतवाल यांची पूर्णवेळ नियुक्तीची मागणी

0
176

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी (ता.भुदरगड) तलाठी कार्यालयात जनसेवेसाठी पूर्णवेळ तलाठी व कोतवाल यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे  गारगोटी शहराध्यक्ष प्रकाश वास्कर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी संपत खिलारी आणि भुदरगडचे तहसीलदार यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी येथील तलाठी व कोतवाल शासनाचे कागदी घोडे नाचवण्यासाठी प्रशासकिय कामकाजात नेहमी व्यस्त असतात. त्यामुळे गावचावडीमध्ये ते फारसे हजर नसतात. त़्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.  मागील अनेक महिने कोतवाल पद रिक्त असल्याने अनेक अडचणी येत आहेत. कोतवाल यांच्या कामाचा बोजा तलाठी यांच्यावर पडत आहे. त्यातच तलाठी यांना चावडी बंद ठेवून कार्यालयीन कामासाठी बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे कामे खोळंबत असल्याने नागरिकांची, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तरी याची दखल घेत तातडीने कोतवाल पद भरावे व तलाठी यांना पूर्णवेळ कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, जितेंद्र भाट, अक्षय सावंत, विद्यार्थी युवा मोर्चाचे तालुका संयोजक केदार गोरे, संग्रामसिंह पोपळे, दीपक कांबळे, सुरेश खोत, संजय देसाई, संपत देसाई, योगेश बुरुड, अमित सुतार, शिवराज गाताडे, राजेश भाट, पांडुरंग यादव आदी उपस्थित होते.