कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘दख्खनचा राजा : जोतिबा’ या मालिकेत मूळ चरित्राच्या विसंगत चित्रीकरण दाखवले जात आहे. हे चित्रीकरण थांबवून ते योग्यरित्या आणि केदारविजय व जोतिबाचे माहात्म्य सांगणारे इतर ग्रंथातील संदर्भ लक्षात घेऊन देवाचे करावे. अन्यथा, या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी व वाडीरत्नागिरीचे सरपंचांनी कोडोली पोलिसांशी आयोजित बैठकीत केली.

विश्वशक्ती मंडळाने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सांगण्यात आले की, आमचा विरोध जोतिबा मालिकेला नसून असत्य कथेला विरोध आहे. यामध्ये पौराणीक मूळ कथा बाजूला गेली असून, कुठे त्याचा संदर्भ लागत नाही. सर्वच केदारनाथ भाविकांना महर्षि व्यास रचित ‘केदार विजय’ ही कथा सर्वश्रुत व्हावी यामुळे भाविकांची बुद्धी भ्रष्ट होणार नाही याची दखल कोठारी व्हिजनने घेतली नाही. यापूर्वी कोठारी व्हिजन व पुजारी, ग्रामस्थ यांच्यात याविषयी चर्चा झाली होती. या मालिकेतील लेखन व त्याचे सविस्तर भाग पौराणिक अभ्यासक, संशोधकांंना, ग्रामस्थांना दाखवून प्रसारित केली जाईल, अशी ग्वाही महेश कोठारे यांनी देवाच्या दारात येऊन दिली होती, पण त्यांनी अशा प्रकारे कोणताही शब्द पाळलेला नाही. यामध्ये देवी-देवतांचा एकेरी उल्लेख, रानटी भाषेतील संवाद,  देवाच्या पायात चप्पल, गळ्यात कवड्याच्या माळा, कपाळी मळवट, यमाई, चोपडाई यांचे लहान रूप, केदारनाथाचा जन्म हे सर्व एक प्रकारे देवाचे विडंबन केले आहे. आताच्या जगात मनोरंजन म्हणून मोबाईलवर रिंग टोन वाजवण्याचे साधन आहे. मार्केटिंगची पद्धती या मालिकेमध्ये वापरली आहे.

या वेळी अभ्यासकांनी आपली मते कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो. नि. सूरज बनसोडे यांच्याकडे मांडली. मालिकेच्या निर्मात्यावर विश्वशक्ती तरुण मंडळ, सरपंच, ग्रामस्थांच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गावचे सरपंच, पुजारी, वयस्कर, अभ्यासक, विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.