राशिवडे (प्रतिनिधी) :  कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. परंतु, लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकारामुळे हे लसीकरण वशिलेबाजीवर होत असल्याचा गैरसमज ग्रामीण भागात पसरू लागला आहे.  त्यामुळे सरसकट  वेगवान लसीकरण होण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनमध्ये सुलभता आणण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.  

ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे १८  ते ४०  वयोगटातील लसीकरणाचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर १८  वयोगटावरील  लसीकरणास सुरुवात झाली.  पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या सोयीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्याची नोंदणी केली. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या जवळच्या गावातील लसीकरण केंद्राची नोंदणी करून लस घेतली. पण यामुळे आपल्या गावात परगावचे नागरिक लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे ही लस वशिल्याने मिळते की काय अशी चर्चा  स्थानिक नागरिकांत सुरू झाली. वास्तविक पाहता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकारामुळे असे गैरसमज होत आहेत, असे निदर्शनास आले.

जर सरसकट लसीकरण करावयाचे असेल, तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन ही अटच रद्द करून गाववार १८ ते ४४  वयोगटातील नोंदीनुसार लसीकरण करावे. कारण अजूनही अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत. किंवा अनेक जण या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. शासनानेही लसीची उपलब्धता योग्य प्रमाणात करून ज्या त्या गावातील पात्र व्यक्तींना ज्या त्या गावातच लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.

याबाबत राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे म्हणाले की, अगोदर लसीकरण केंद्रे कमी असल्यामुळे अनेकांनी परगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला असेल की लस वशिल्याने परगावच्या व्यक्तींना मिळते. पण असे काहीही नाही. इथून पुढे सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून लसीकरण होणार असल्याने हे प्रकार बंद होतील.