कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड ठरलेल्या आणि थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सीपीआर रुग्णालयातील अधिष्ठातांची नेमणूक ३ वर्षासाठी करण्यात यावी. आणि शेंडा पार्कमध्ये १ हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे, या प्रमुख मागण्यासंह अन्य प्रलंबित मागण्या सीपीआर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सीपीआर प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी सीपीआर मधील वारंवार बदली होणाऱ्या अधिष्ठातांची नेमणूक ३ वर्षासाठी करण्यात यावी, शेंडा पार्कमध्ये १ हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात यावे, अपघात विभागात रात्र पाळीमध्ये तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, प्रसुती विभागाचे विस्तारीकरण करून बेड संख्या वाढवावी, रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मंजूर रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी सीपीआर बचाव कृती समितीचे वसंतराव मुळीक, बबनराव राणगे, कादर मलबारी, बाळासो भोसले, अवधूत पाटील, संभाजीराव जगदाळे, आनंद म्हाळूंगकर, छगन नागंरे, धोंडीराम कात्रट, दत्ता बोडके आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.