इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमानिमित्त बेकायदेशीर फलक लावले जात आहेत. यातून शहरात गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत नगराध्यक्षा अलका स्वामी व प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावर नगराध्यक्षा स्वामी यांनी अनुचित प्रकार रोखण्यासाठी  तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अतिक्रमण विरोधी पथकास दिल्या. तर उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी तातडीने कारवाई करण्यात येईल, असे  सांगितले. यावेळी इनामचे राजू कोंनूर, उदयसिंह निंबाळकर, राजूदादा आरगे, शीतल मगदूम, आप्पासाहेब पाटील, दीपक पंडित, राजू पारीक, महेंद्र जाधव, जतीन पोतदार, राजेश बांगड, पंडित ढवळे, अमोल मोरे, रावसाहेब चौगुले, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.