नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट  घेण्यासाठी पोहोचले. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच रोखून धरले आहे.

या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदार आहेत. या सर्व खासदारांनी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केली. मात्र, यासर्वांना पोलिसांनी तीन किमी आधीच रोखले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  आम्ही येथे गडबड करायला आल्याच्या कारणावरून  प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखले  आहे. मात्र, शेतकऱ्यांशी सरकारची वागणूक अतिशय दुर्देवी आहे. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चाच करु नये,  असे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल इतकी कठोर बंधन येथे घातली आहेत. असंवेदनशील हे सरकार आहे, सरकारमधील लोकांना शेतकरी आपला वाटत नाही. आम्हाला पुढे जाऊ दिले नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन येथील परिस्थिती त्यांना समजावून सांगणार आहोत.