माणुसकीला काळीमा : चंद्रपुरात ७ जणांना भरचौकात बांधून जबर मारहाण

0
361

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील ७ जणांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केल्याची घटना महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावात घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गावाबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  

वणी खुर्द गावातील काही कुटुंब जादूटोणा करत असल्याचा संशय नागरिकांना आला होता. मोहरमच्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला. त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असे सांगितले व लगेच गावकऱ्यांनी कसलाही विचार न करता त्या कुटुंबातील सदस्यांना बांधून मारहाण केली.  तसेच त्या सर्वांना भर चौकात लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली.

या मारहाणीत शांताबाई कांबळे ( वय ५३), शिवराज कांबळे ( वय ७४), साहेबराव हुके ( वय ४८), धम्मशीला हुके ( वय ३८), पंचफुला हुके ( वय ५५), प्रयागबाई हुके (वय ६४), एकनाथ हुके (वय ७०) यांचा समावेश आहे. या मारहाणीत गंभीर झालेल्या ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. पुन्हा अशी हिंमत कुणाची होऊ नये, यासाठी निश्चितच कडक पावले उचलली जातील. पुढील अधिवेशनात अशा विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.