दीपाली चव्हाण आत्महत्या : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक निलंबित

0
116

अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाटमधील वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. मात्र, रेड्डी यांचेवर कारवाई झाली नव्हती, त्यामुळे भाजपने कारवाईसाठी दबाव वाढवला होता. राज्य सरकारने अखेर रेड्डी यांना निलंबित केल्याचा आदेश काढला असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या लेडी सिंघम म्हणून परिचित होत्या. दीपाली यांनी २५ मार्च रोजी मेळघाटमध्येच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये विनोद शिवकुमार याने छळ केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दीपाली चव्हाण यांनी वारंवार विनोद शिवकुमार याची तक्रार करूनही त्याच्यावर कारवाई न करता रेड्डींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

भाजपने रेड्डी यांच्या अटकेची मागणी लावून धरली. मंगळवारी अपर मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर भाजपाकडून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्यावर सरकारकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.