बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे गावात यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी ‘देऊळबंद’ चा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. ग्रामदैवत भैरवनाथच्या मंदिरात यावेळी नवरात्रोत्सवात भक्तांनी घरी आणि पुजारी, बलुतेदार आणि पोलीस पाटील देवाच्या दारी अशी परिस्थिती आहे. या  निर्णयाने कोरोनाला अटकाव करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. तर परिसरातील गावांमध्येही गावामध्येही असाच निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.

बोरपाडळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीने एक आचारसंहिता केली आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत नागरीकांनी स्वतःच्या घरीच देवाचे पूजन करावयाचे आहे. मंदिरात उपवास करणाऱ्या भक्तांसह अन्य भाविकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीत होणाऱ्या आरती तसेच जागरण कालावधीतही नियमांचे कडक पालन होणार आहे. या नियमावलीमुळे सोने लुटण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. बाहेरगावातील भक्तांना तेल घालण्यासाठी यावर्षी प्रथमच निर्बंध घालण्यात आले आहेत.