चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी

0
141

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. चर्चेच्या फेऱ्या काय करता, निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ते म्हणाले, ‘शेतकरी ऐन थंडीत १८ दिवस आंदोलन करतो आहे. १८ दिवस त्यांचे हे आंदोलन ताणणं हे सरकारचं अपयश आहे. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसे करायचे हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखे आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदे आहेत असे सांगून सरकारने कायदे केले. सरळसरळ सांगायचे होते की आम्ही उद्योगपतींसाठी हे कायदे करत आहोत. हमीभाव फक्त कागदावरच राहणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? हमीभाव हा बंधनकारक करावा असे आमचे म्हणणे आहे.’

‘जो नियम उसाला तोच नियम बाकी पीकांना असायला हवा, अशी तरतूद करणारा कायदा करा. मी स्वत: यासंबंधीचे खाजगी विधेयक २०१८ साली खासदार असताना मांडले होते. त्या विधेयकाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. तेच विधेयक सरकारी विधेयक पाठिंबा म्हणून मांडावे’, असेही ते म्हणाले.