कतार (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरुन सुरुवातीला कतारवर जोरदार टीका केली होती; मात्र कतारने मोठ्या थाटामाटात या वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. आता या आयोजनाची काळी बाजू समोर आली आहे. या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी झटणाऱ्या तब्बल ४०० ते ५०० कामागारांचा बळी गेल्याची कबुली कतारने दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनात गुंतलेल्या कतारच्या एका उच्च अधिकार्‍याने पहिल्यांदाच या स्पर्धेशी संबंधित कामगारांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. कतारच्या सर्वोच्च समितीचे सरचिटणीस हसन अल-थवाडी यांनी ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत ही आकडेवारी सांगितली. या आधीही दोहाने या स्पर्धेची तयारी करणाऱ्या कामगारांच्या मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते.

फिफासाठी उभारल्या जाणाऱ्या ८ स्टेडियममध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन आणि वर्णभेदाच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या स्पर्धेसाठी अनेक वर्षांपासून तयारी सुरू होती. हजारो स्थलांतरित मजुरांना २०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीचे स्टेडियम, मेट्रो लाईन आणि स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या नवीन पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम देण्यात आले होते. यामध्ये शेकडो कामगारांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश पत्रकार मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत हसन यांना विश्वचषक स्पर्धेसाठी काम केल्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूची खरी आकडेवारी काय आहे?, असे विचारले होते. यावर उत्तर देताना ‘अंदाजे आकडेवारी ४०० ते ५०० च्या दरम्यान आहे, असे हसन यांनी म्हटले आहे.