पुणे (प्रतिनिधी) :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची  प्राणज्योत मालवली.

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.  त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवडमध्ये झाला. भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.  २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आहे.

जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.  महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी  ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले.  त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.