कोल्हापूर (प्रतिनिधी)  : गिरोली घाटातील पांडवलेणी येथे प्रेयसीचा खून करून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकर कैलास पाटील याचा आज (बुधवारी) सकाळी उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. प्रेयसीचा खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. प्रेयसी ऋतुजा चोपडे (वय २१) हिने प्रियकर कैलास पाटील यास लग्नास नकार दिल्याच्या रागात हा सर्व प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

प्रियकर कैलास पाटील कागल तालुक्यातील लिंगनूर येथील रहिवासी असून, प्रेयसी ऋतुजा चोपडे हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील रहिवासी होती. तीन वर्षांपूर्वी कैलासने ऋतुजाला लग्नासाठी विचारले होते. त्यावेळी ऋतुजाच्या आई-वडिलांनी लग्नास होकार दिला होता; परंतु प्रियकर कैलास हा काही कामधंदा करत नसल्याने तसेच ऋतुजा आणि कैलास यांच्या वयामध्ये १० ते १२ वर्षांचे अंतर असल्याने १ वर्षापूर्वी आई-वडिलांनी त्यांच्या लग्नास नकार दिला होता. ऋतुजा ही देखील लग्नास तयार नव्हती.

लग्न करण्यास नकार दिल्याने कैलास काही दिवसांपासून तणावात होता. मंगळवारी दुपारी त्याने ऋतुजाला भेटायला बोलावले. दोघेही पोहोळे तर्फ आळते परिसरातील पांडव परिसरात गेले. तेथे प्रियकर कैलासने गिरोली घाटातील पांडवलेणी येथे ऋतुजाचा गळा आवळून खून केला. खुनानंतर कैलासने व्हॉटस्ॲप् स्टेट्सवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकला. नातेवाइकांच्या ग्रुपवरही त्याने मेसेज टाकला. कैलासच्या वडिलांना रात्री आठच्या सुमारास विषप्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी तातडीने वडगाव पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. कोडोली पोलिस ठाण्यात त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कैलासचे लोकेशन पडताळून गिरोली घाटाकडे धाव घेतली. त्यांना घटनास्थळी कैलास हा अत्यवस्थ अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (बुधवारी) सकाळी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

ऋतुजाच्या खुनाची बातमी समजल्यानंतर तिचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी आले होते. ऋतुजा ही डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती. तेथेच ती वसतिगृहात राहत होती. कैलास व ऋतुजा नातेवाईक आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर दोघांच्या नातेवाइकांना धक्का बसला आहे.