कुशिरे माळावर विषारी औषध प्राशन केलेल्या जवानाचा मृत्यू…

0
2066

राशिवडे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील माळावर काल (मंगळवार) रोजी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलेला जवानाचा आज (बुधवार) सकाळी उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये मृत्यू झाला. बजरंग बळवंत चौगले (वय ३२, रा. आवळी ता. राधानगरी)  असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजरंग चौगुले मागील ११ वर्षांपासून लष्करात सेवा बजावत आहेत. ते सुट्टीवर गावी आले होते. कोल्हापूर येथे कामानिमित्त जातो, असे सांगून ते काल घराबाहेर पडले होते. कुशिरे येथे असणाऱ्या माळरानावर काल दुपारी त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यानंतर अस्वस्थ वाटायला लागल्यावर त्यांनी मित्रांना फोन करून याबाबतची कल्पना दिली. यावेळी त्यांना सीपीआर येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. बजरंग हा घरी एकुलता एक होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आहेत. त्यांचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.