जि.प.समोर पृथ्वी विद्यालय संस्थापकांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमरण उपोषण…

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगांव येथील शरद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पृथ्वी माध्यमिक विद्यालयातील भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी. संस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांच्या वतीने अशोक नंदीकुरळे यांनी आज (मंगळवार) पासून जि.प. समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या संस्थेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, याचे निवेदन शिक्षणाधिकारी,  शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितले.

यावेळी अशोक नंदीकुरळे म्हणाले की, श्री शरद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पृथ्वी माध्यमिक विद्यालयात उत्तम लक्ष्मण चव्हाण हे सहाय्यक शिक्षक आहेत. यांची जातवैधता तपासून त्यांच्यावर कार्यवाही होण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. तसेच वंदना जगन्नाथ पाटील या सहाय्यक शिक्षिका असून त्यांची दोन नेमणुका केल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

तसेच नियमित प्रभारी मुख्याध्यापक पद भरण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रभारी मुख्याध्यापक पद मिळत नसल्याने ताबडतोब प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. आंदोलनात अशोक नंदीकुरळे आणि सुरेश दवडे यांचा समावेश आहे.