कोल्हापूर (प्रतिनिधी) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास कालपासून (शनिवार) प्रारंभ झाला आहे. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची महापूजा ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’ स्वरुपात बांधण्यात आली आहे.

द्वितीयेला करवीरनिवासिनी ही पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन देताना विराजमान झालेली आहे. याची पार्श्वभूमी अशी की, श्री महालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देते, तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो. आणि ते महालक्ष्मीला विष्णुस्वरुपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात. सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने देवीची स्तुती करतात.

२०२० सालच्या नवरात्रोत्सवामध्ये करवीरनिवासिनीचे करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना राबविली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्रीकरवीरनिवासिनीचे व्यापक आणि आदिशक्ति स्वरूपच वारंवार प्रगट होताना दिसते. कधी ती शिवाचे संहारकार्य करताना दिसते,  तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्यही करताना दिसते. तर कधी विष्णूचे पालनकार्यही तीच करते. ब्रह्मा विष्णु-शिवाची ती जननीही आहे आणि आत्मशक्तिही.

ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.