बंगळुरू (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत आज (शनिवार) ही निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे दुसरे महत्त्वाचे पद मानले जाते. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे  पुन्हा एकदा त्यांचीच फेरनिवड केली नसल्याचे बोलले जात आहे. दीर्घकाळ या पदावर काम करताना संघटनात्मक पातळीवर तसेच संघ -भाजपा समन्वयाच्या पातळीवरही जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.  

दरम्यान, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि २०२५ ला संघ शताब्दी वर्षानिमित्त होणारे विविध कार्यक्रम लक्षात घेता संघ आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने सरकार्यवाहपदावर नव्या चेहऱ्याला संधी देण्यात यावी, अशी मागणी संघातून होत होती. त्यानुसार सध्या सहसरकार्यवाहपदी असलेल्या होसबळे यांना बढती देण्यात आली आहे.