कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील तमनाकवाडा,बाळेघोल परिसरात आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास एका टस्कराचे दर्शन झाले.  बाळेघोल परिसरातल्या हणबरवाडी,बेरडवाडीच्या जंगलातून हा टस्कर वाट चुकून आल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.

आज सकाळी कापशी,बाळेघोल मार्गावरील मारुती माळ येथे फिरायला जाणाऱ्या लोकांना हा टस्कर निदर्शनास आला. हा टस्कर तमनाकवाडा आंबेओहळ पुलाजवळून तमनाकवाडा परिसरात गेला. या टस्करला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे हत्ती बिथरून वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावत सुटला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी लोक त्याच्या मागे लागले. त्यामुळे हा टस्कर काही काळ उसातच थांबला. रस्ता पार करून पुन्हा बाळेघोल हणबरवाडी गावाला लागून असलेल्या डोंगराकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे तो बिथरत होता.

याठिकाणी धोका असूनही अनेक तरुण आणि युवक त्याच्या मागे लागले होते. यावेळी वन विभागाचा एकच कर्मचारी तिथे उपस्थित होता. रस्त्यावर गर्दी वाढल्यामुळे नऊच्या सुमारास रस्ता पार करून हा टस्कर पुन्हा बाळेघोल,हणबरवाडीच्या दिशेने उसाच्या आणि ज्वारीच्या पिकातून पुढे गेला. दरम्यान, ही घटना समजताच कापशीचे वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी हा टस्कर कळपातून वाट चुकून आल्याचे सांगितले.