मुंबई  (प्रतिनिधी) : कोकणातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. शिवसेनेसोबत बंद खोलीत चर्चा झालेली नाही. असे सांगून आपण उघडपणे सर्वकाही करतो, असे शहा यांनी म्हटले होते. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या  अग्रलेखातून  प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  

देशासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत व देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. कोकणातील सभेत धुरळा उडवत असताना तिकडे उत्तराखंडात जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली. गावेच्या गावे वाहून गेली. गृहखात्याने तेथे खास लक्ष देणे गरजेचे आहे. लाखो शेतकरी पुढच्या सहा महिन्यांचा शिधा घेऊन दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांचे प्रश्न अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे सोडविण्याची गरज आहे. भाजपच्या नात्या-गोत्यातील कुणीएक दीप सिध्दू शेतकऱ्यांची झुंड घेऊन लाल किल्ल्यावर घुसला व तिरंग्याचा अपमान केला. त्याच्यावर कारवाई होत नाही. 370 कलम उडवूनही कश्मीरात पंडितांची घरवापसी झाली नाही. देशातील अनेक भागांत अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न उफाळून आले आहेत. भाजपपुरस्कृत एका ‘टी.व्ही.’ अँकरने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती फोडून राष्ट्रद्रोहासारखा अपराध केला. त्यावरसुद्धा ‘डंके की चोट’पर कारवाई शिल्लक आहे. गृहमंत्र्यांनी आता अशा राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवले तर बरे. नाहीतर राजकीय धुरळा उडविण्यात वेळ निघून जाईल व देश खड्ड्यात  पडेल.