कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतीबाबत जाहीर प्रकटन करण्यात आले होते. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) बिंदू चौक सब जेलसमोर असलेल्या आझाद गल्लीतील जामदार वाड्याची धोकादायक इमारत जेसीबीच्या साहाय्याने उतरवण्यात आली. ही इमारत राजेंद्र जामदार यांच्या मालकीची आहे.

शहरात एकूण १७० इमारती धोकादायक आहेत. यातील २७ इमारती या न्यायप्रविष्ट आहेत. आत्तापर्यंत ५० इमारती उतरविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने शहरातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित मालकांना रीतसर नोटीस बजावल्या आहेत. मात्र अनेकांनी आपल्या घराचा धोकादायक भाग काढून घेतला नाही. तसेच महापालिकेच्या नोटीसीची दखल घेतलेली नाही. आज शहरातील बिंदू चौक सब जेल समोर असलेल्या आझाद गल्लीतील सी वॉर्ड मधील जामदार वाड्याची धोकादायक इमारत जेसीबीच्या साहाय्याने उत्तरावण्यात आली. ‍ही इमारत जुनी असल्याने बऱ्याच भागाची पडझड झालेली होती. शिल्लक भाग धोकादायक स्थितीत असल्यामुळे वेळोवेळी नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या.

शहरातील ज्या धोकादायक इमारती आहेत त्या तत्काळ उतरवून घ्याव्यात अन्यथा या  इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.