पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

0
91

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यासह परिसरातील आपटी, सोमवारपेठ, इंजोळे, तुरूकवाडी, वेखंडवाडी परिसरात वन्य प्राण्यांमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गव्यांकडून शाळू पिकाचे आपटी, सोमवार पेठ येथे नुकसान झाले आहे. भात व भुईमूग व हायब्रीडचे पीक काढल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शाळू पिकाची लागवड केली आहे. आता हे पीक चांगले आले असताना गव्यांकडून नुकसान होत आहे. दिवसभर वानरांपासून वेगवेगळ्या पिकांचे शेतकऱ्याला रक्षण करावे लागते. आता रात्रीचेही शेतकऱ्यांना जागरण करावे लागत आहे. रात्रीच्या वेळी अवेळी गवे येऊन शेतातील चांगले आलेले पीक खाऊन फस्त करत आहेत. बहुतेक या ठिकाणी आठ-दहा गवे असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यशवंत गायकवाड, प्रकाश खांबे, सयाजी गायकवाड, प्रकाश काशीद यांच्या शेतातील शाळू पिकाचे मोठ्या प्रकारे नुकसान केल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीही या भागातील शाळू पिकाचे गव्यांनी प्रचंड नुकसान केले होते. पुन्हा तोच अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. तेव्हा या गव्यांचा वनविभागाकडून त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.