करवीर (प्रतिनिधी) : सक्तीने करण्यात येणारी वीज कनेक्शन तोडणी थांबवावी. अशी मागणी करत दलित महासंघाच्या वतीने उंटावरून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून गांधीनगर महावितरणचे शाखा अभियंता अतुल सुतार यांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये. वीज ग्राहकांची तोडण्यात आलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात यावे, जे ग्राहक वीज बिल भरण्यास तयार आहेत त्यांना वीज बिल भरण्यासाठी हप्त्यांची सोय करून देण्यात यावी. तसेच वीज वितरण कर्मचाऱ्याकडून नागरिकांना करण्यात येणारी अरेरेवी थांबवावी. या प्रमुख मागण्या दलित महासंघाच्या वतीने करण्यात आल्या.

तसेच गांधीनगरच्या महावितरण कार्यालयावर उंटावरून मोर्चा काढून वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येवून जोरात घोषणाबाजीही करण्यात आली. उंटावरून शेळ्या हाकणे सरकारने थांबवावे, सामान्य जनतेमध्ये विज बिल भरण्यासंदर्भात जो संभ्रम निर्माण झाला आहे तो शासनाने वीज माफीचा निर्णय घेऊन थांबवावा. अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी नबीसाब नदाफ, रामभाऊ साळुंखे, वीरेंद्र भोपळे, अनिल हेगडे, लखन इंगळे, ग्रा. पं. सदस्य गणेश देवकुळे, निखिल पवार, अमोल साठे, महेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.