कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकतीच झालेली पुणे पदवीधर निवडणूक भाजपाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५८ तालुक्यांमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या ताकदीने लढली आहे. भाजपा विरुद्ध तीन पक्ष अशी लढत झाल्याने भाजपचा पराभव झाला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी ५ जिल्ह्यांत प्रवास, मेळावे, गाठी-भेटी याप्रकारे खूप मेहनत घेतली. परंतु फक्त निवडणुकीचे निमित्त करून ज्यांना पक्षामध्ये महत्वाचे स्थान नाही अशा लोकांनी दादांचा राजीनामा मागणे हास्यास्पद आहे. फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्त्व कमी होणार नाही, अशी खरमरीत प्रतिक्रिया देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, मागील ५ वर्षांत राज्यात ज्या काही निवडणुका झाल्या,  अनेक मोठ्या नेत्यांचे प्रवेश, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीमधील विजय एकूणच भाजपाचा झेंडा गल्ली पासून दिल्ली पर्यंत नेण्यात या संपर्ण यशामध्ये दादांचा सिंहाचा वाटा नाकारता येणार नाही. ज्या झाडाला फळे येतात त्याच झाडाला दगडे मारली जातात या म्हणी प्रमाणे काहीही झाले तरी उठसूट दादांवर आरोप केले जातात. यातून महाराष्ट्रात दादांचे स्थान किती मोठे आहे हेच दिसून येते. त्यामुळे राज्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष पासून बूथ अध्यक्षापर्यंत सर्व जण दादांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे दोन-चार फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्व कमी होणार नाही.