कोल्हापूर (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘शांतदेवी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले.  या सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यापीठाच्या दुसऱ्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष-आमदार सतेज डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता,  कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डीन राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.

येत्या काही वर्षांत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचावे, यासाठी सर्व सहकारी कार्यरत असल्याचे डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले. ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, भविष्यात हे विद्यापीठ नामांकित शिक्षण केंद्र होईल यात शंका नाही. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा व भविष्यातील योजनेचा आढावा मांडला. सकारात्मक विचार ठेऊन, योग्य ध्येय ठेऊन वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते. हे विद्यापीठ काही वर्षांत पहिल्या १०० विद्यापीठात येईल व एनआरआय रँकिंगमध्येही मोठे स्थान मिळवले, अशी खात्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना ग्लोबल एक्सपोझर मिळवून देण्यासाठी तसेच संशोधनाला गती देण्यासाठी इस्राईल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युके आदी देशातील ख्यातनाम विद्यापीठासोबत करार केले आहेत. शेतीतील नवे तंत्रज्ञान, संशोधन केव्हीकीच्या सहकार्याने शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी दिली. संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएफओ श्रीधर स्वामी, सीएचारओ श्रीलेखा साटम, केतन जावडेकर, अंजली पाटील, प्रा. सुनंदा शिंदे, डॉ. जे. ए. खोत यांच्यासह ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

शिष्यवृत्ती प्राप्त १७ विद्यार्थी 

अवंतिका कदम (बीबीए), शिवानी हुपरीकर (एमबीए), प्रणाली वावरे (एमबीए-एबीएम),  सरोश पठाण (बी.टेक फूड टेक्नॉलॉजी), सचिन शिंदे (एम.टेक.फूड टेक्नॉलॉजी), शुभम इंगळे (एमएस्सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी), रोहन खोत (एमएस्सी अनलेटिकल केमिस्ट्री),ऋतुजा घोरपडे (एमएस्सी ऑर्गनिक केमिस्ट्री), सूरज माने (बी. टेक कॉम्प्युटर सायन्स), दिशा पाटील (बी. टेक कॉम्प्युटर सायन्स एआय अँड एमएल), श्वेता भोसले (बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स -डेटा सायन्स), वरद बागल (एम. टेक कॉम्प्युटर सायन्स एआय अँड एमएल), सानिका पाटील (बीसीए), स्नेहा जाधव (एमसीए), अथर्व पाटील (बी.टेक अॅग्री. इंजिनिअरिंग), शोएब  पटेल (एम.टेक अॅग्री. इंजिनिअरिंग), वसिफा आगलावे (पीएचडी.) यांचा समावेश आहे.