कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ‘रामानुजन फेलोशिप’अंतर्गत भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली आहे. पॉलीऑक्सोव्हानाडेट इंटरकॅलेटेड लेयर्ड कॉपर हायड्रॉक्साईड कंपाऊंड तयार करण्याच्या पद्धतीला हे पेटंट जाहीर झाले असून, विद्यापीठाला मिळालेले हे सहावे पेटंट आहे.

डॉ. जे. एल. गुंजकर (रामानुजन फेलो) व प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे (रिसर्च डिरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी २१ मे २०१८ मध्ये संशोधकांनी पेटंटसाठी अर्ज केला होता. विविध चाचण्यांमधून आणि ४ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट २३ जून २०२२ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर करण्यात  आले. या संशोधांतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण पद्धती पुढील २० वर्षांसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.

कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सांगितले की, ‘डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे सहावे पेटंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी व अभिमानास्पद आहे. जुलै २०२१ मध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या पहिल्या पेटंटला मान्यता मिळाली होती. त्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळवलेले हे सहावे पेटंट आहे.’

मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांनी सांगितले, ‘या संशोधनाद्वारे अतिशय नावीन्यपूर्ण असे पॉलीऑक्सोव्हानाडेट इंटरकॅलेटेड लेयर्ड कॉपर हायड्रॉक्साइड या पदार्थाचे काचेवर डीपॉसिशन घेण्यात आले. हा पदार्थ गॅस सेन्सर, सुपरकॅपॅसिटर अथवा बॅटरीमध्ये अतिशय उपयुक्त ठरू शकतो.’

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांच्यासमवेत रिसर्च डिरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, संशोधक विद्यार्थी श्रीकांत सदावर आणि डॉ. नवनाथ पडळकर, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष-आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभिनंदन केले आहे.